ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद;
तहसीलदारांना निवेदन देत सरकारचे वेधले लक्ष
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज | परंडा, दि. २० मे
ऑनलाईन औषध विक्री, बनावट औषधांचा वाढता धोका आणि मेडिकल व्यवसायासमोरील गंभीर समस्यांविरोधात परंडा शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी एकदिवसीय बंद पाळत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आल्याने या आंदोलनाची तीव्रता दिसून आली.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) यांच्या आवाहनानुसार हा बंद पाळण्यात आला. यावेळी परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधले.
औषध विक्रेत्यांनी आरोप केला की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून अनियंत्रित ‘डीप डिस्काउंट’ पद्धतीमुळे स्थानिक व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच बनावट व संशयास्पद औषधांच्या विक्रीत वाढ होत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनात ई-फार्मसी संदर्भातील GSR 817(E) अधिसूचना मागे घेण्याची तसेच कोविड काळातील GSR 220(E) अधिसूचनेचा पुनर्विचार करून ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. बनावट औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे आणि औषध वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता कायम ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली.
“औषध व्यवसाय हा केवळ व्यापार नसून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रशिक्षित फार्मासिस्ट, वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन आणि योग्य औषध वितरण ही रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बाब आहे,” असे मत यावेळी औषध विक्रेत्यांनी व्यक्त केले.
विक्रेत्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी विकास जगदाळे, तालुका प्रमुख असिफ सय्यद, जिल्हा प्रतिनिधी बाशा भाई शहाबर्फीवाले, गणेश टकले, जयराम डाकवाले, सागर बोराडे, रणजित पाटील, महेश घाडगे, विष्णू भिसे, अन्वर शेख, इलीयस बागवान, राजेश ठक्कर, अभिजित शेरखाने, सादिक गणेचारी, दीपक मोरे, मुजमिल शेख, विष्णू केमदारने, जोतिराम चोबे, सहदेव हिवरे, दत्तात्रय कदम, आकाश पराडे, ज्ञानेश्वर भानवसे, अभय मस्के, यशवंत शिंदे, तुषार बागल, राकेश बेदमुथा, सचिन पाटील, फैजल देहलूस, अमोल कारले, पुरुषोत्तम चोबे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment