एस.टी.च्या विलीनीकरणासाठी 'जनशक्ती'ने घातला मंत्रालयासमोर गोंधळ
▪️ आंदोलकांना घेतले पोलिसांनी ताब्यात
▪️चित्रा वाघ, आ.गोपीचंद पडळकर, अतुल खुपसे-पाटील पोलीस ठाण्यात तळ ठोकून
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
एकीकडे एस.टी.च्या विलीनीकरणासाठी आझाद मैदानावर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला असतानाच दुसरीकडे आज सकाळी मंत्रालयाच्या समोर अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. मंत्र्याला आझाद मैदानावर यायला वेळ नाही, त्यामुळे आम्हीच इकडे आलो असल्याचे जनशक्ती च्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांनी सांगितले. दरम्यान बराच वेळ पोलिसांशी झटापट झाल्यानंतर विनिता बर्फे यांच्यासह दोन महिला व रऊफ पटेल आणि बारराजे चव्हाण या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ.गोपीचंद पडळकर त्यांनी तात्काळ मरिन ड्राइव्ह पोलिस चौकीत दाखल होऊन तळ ठोकला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसापासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहता महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एस.टी.च्या विलीनीकरणाचा लढा महाराष्ट्रभर उभा केला आहे. या लढ्याला जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पाठिंबा दर्शवित चार दिवसापासून आझाद मैदानावर तळ ठोकून बसले आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाकडे सरकार पक्षातील अद्याप एकही मंत्री चर्चा करण्यासाठी गेला नाही. त्यामुळे जनशक्ती संघटनेने मंत्रालयावर धडक मारण्याचा निर्णय घेतला.
त्याप्रमाणे 'जनशक्ती'चे प्रमुख अतुल खूपसे पाटील, कल्याण गवळी व राणा वाघमारे हे पत्रकाराच्या वेशात मंत्रालयाच्या बाहेर आले. आंदोलन करणाऱ्या जनशक्तीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांच्यासह दोन कार्यकर्त्या, महासचिव रउफ पटेल, जिल्हाप्रमुख बाबासाहेब चव्हाण हे गनिमीकाव्याने मंत्रालयासमोर पोहोचले. व अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्याठिकाणी पोलीस आले व त्यांनी पटेल आणि चव्हाण यांना ताब्यात घेतले.
महिलांना ताब्यात घेण्यासाठी महिला कर्मचारी नसल्याने आंदोलक महिलांनी रस्त्यावर लोळून निषेध चालू केला. यावेळी पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बर्फे यांनी 'महिलांच्या अंगाला हात लावाल तर याद राखा' अशी तंबी पुरुष पोलिसांना दिली. आणि तसा प्रयत्न केलाच तर अर्धनग्न होऊन आंदोलन करू असा इशारा देतात पुरुष पोलिस बाजूला सरले. या वेळी 27 मिनिटे बर्फे व पोलिसांची बाचाबाची झाली.
त्यानंतर दोन महिला कॉन्स्टेबल आल्या मात्र बर्फी व दोन महिला आंदोलक ताब्यात येत नसल्याचे पाहून आणखी महिला कर्मचारी आल्यानंतर बर्फी यांना ताब्यात घेण्यात आले.
[]
- एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी जनशक्ती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अत्यंत धाडसाने मंत्रालयासमोर केलेले आंदोलन अतिशय कौतुकास्पद आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही अशी ग्वाही दिली आहे. यातूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी त्याचा उद्रेक महाराष्ट्रभर होईल. शिवाय महिलांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये.
चित्रा वाघ
प्रदेशाध्यक्ष, भाजपा महिला आघाडी
... अन्यथा पोलीस ठाण्यात आंदोलन
[]
- तमाम महाराष्ट्रातील एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आज आझाद मैदानावर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासनाचा कोणताही मंत्री आला नसल्याने जनशक्ती संघटनेने मंत्रालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर पोलिस ठाण्यातच आंदोलन सुरू केले जाईल.
- आ. गोपीचंद पडळकर
▪️चौकट
यापेक्षा तीव्र आंदोलन करणार
- लालपरी म्हणजे शहर व गावांना जोडणारा दुवा आहे. कर्मचारी म्हणजे या लालपरी चा आत्मा. गेली कित्येक वर्ष हा आत्मा तुटपुंज्या पगारावर तडफडतोय. मात्र याकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. पवार व ठाकरे नुसत्याच विकासाच्या थापा मारतात. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना बद्दल त्यांनी अद्याप ब्र शब्द काढला नाही. शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. खाजगी कर्मचारी कामावर घेऊन एसटी संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. अशाने कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही. सरकार जाणून-बुजून खुनशी भूमिका घेत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार.
अतुल खूपसे पाटील
संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment