जिल्हयातील बँकाच्या कार्यपद्धतीवर उमेद सीईओ डॉ.हेमंत वसेकर यांनी व्यक्त केली नाराजी -
बँकांच्या केंद्र व राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करणार अवगत.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
तुळजापुर- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष उस्मानाबाद अंतर्गत सन २०२१-२२ च्या वार्षिक उद्दिष्टाच्या अनुषंगाने जिल्हास्तरिय आढावा बैठकीचे आयोजन उमेदचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह तुळजापुर येथे करण्यात आले होते यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानांतर्गत कार्यरत तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक सदर बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी स्वयंसहाय्यता समुह स्थापना, ग्रामसंघ स्थापना, फिरता निधी, समुदाय गुंतवणुक निधी, जोखीम प्रवणता कमी करण्याबाबतचा निधी, स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज वितरण, गटांचे खाते उघडणीचे प्रलंबित प्रस्ताव, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना आदी विषयांचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. सदर विषयाच्या अनुषंगाने भुम, परंडा, या तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व विषयात प्रगती करा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी तंबीदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी दिली. स्वयंसहाय्यता समूहांची प्रलंबित बँकनिहाय कर्जप्रकरणे व प्रलंबित खाते याबाबत देखील आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हयातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या प्रमुख तसेच इतर बँकांच्या कर्ज वितरणाच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, सदर बँकांच्या केंद्र, तसेच राज्यस्तरावरील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणली जाईल तसेच प्राप्त निधी खर्च करण्याबाबत १५ फेब्रुवारीची मुदत सर्व जिल्हयांना देण्यात आली असुन याबाबत उस्मानाबाद जिल्हयाने देखील प्रगती करावी. तुळजापुर येथील तीर्थक्षेत्राचा स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादन विक्रीस असलेला वाव अभ्यासावा यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची मदत घ्यावी.जिल्हयातील समुहातील महिलांना शाश्वत उपजीविकेचा स्त्रोत मिळवुन देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, समाधान जोगदंड, अमोल सिरसट, गोरक्षनाथ भांगे यावेळी उपस्थित होते. उमेद सीईओ यांनी उस्मानाबाद येथील उमेद स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या जिल्हास्तरीय विक्री केंद्राला भेट दिली व मोठया प्रमाणावर खरेदि करत उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
Comments
Post a Comment