रेल्वे गेटमॅनला युवकाकडून जबर मारहाण आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
यवतमाळ : झरी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ एप्रिलच्या रात्री घडली. यावरून मुकूटबन पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
मुकुटबन येथून ७ किमी अंतरावरील मांगली येथील गेट क्र. २२ सी वर गेटमॅन म्हणून रेल्वे कर्मचारी धर्मेंद्रकुमार सिम्भूदयाल मीना (वय २८, रा. रेल्वे कॉलनी मुकूटबन) हा सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजताच्या शिफ्टमध्ये ड्युटीवर होता. रात्री ८.४० वाजेदरम्यान रेल्वे येत असल्याचा कॉल आला. त्यामुळे रेल्वेगेट कुणीही ओलांडू नये, याकरिता धर्मेंद्रकुमार याने रेल्वेगेट खाली केले. तेवढ्यात मुकूटबन येथील राहुल दुर्गे (वय २८,) दुचाकी क्र. एपी ०१, एसी ४५१८ घेऊन मद्यधुंद अवस्थेत आला व रेल्वे फाटक उघड असे म्हणून अश्लील शिवीगाळ देणे सुरू केले. रेल्वे गाडी गेल्याशिवाय फाटक उघडणार नाही व पाच मिनिटात रेल्वे गाडी जाणार आहे. रेल्वेगाडी जाताच फाटक उघडतो, असे म्हणताच राहुल दुर्गे याने अंगावर धावत येऊन कर्मचारी धर्मेंद्रकुमार याला लाथाबुक्यांनी जबर नाकावर व तोंडावर मारहाण केली.
त्यात धर्मेंद्रकुमार याच्या नाक व तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या व तो या हाणामारीत गंभीर जखमी झाला.मारहाण करत असताना धर्मेंद्रकुमार याने आरडाओरड केल्याने राहुल दुर्गे दुचाकी घेऊन पळून गेला. काही वेळातच त्याच गेटवर ड्युटी करणारे कर्मचारी संजय लेडांगे, राकेश ताडुरवार व रंजितकुमार सिंग आले. रंजितकुमार सिंग यांच्यासोबत पोलीस स्टेशन गाठून राहुल दुर्गे विरुद्ध वरील प्रमाणे तक्रार दिली. यावरून मुकूटबन पोलिसांनी आरोपी राहुल दुर्गे याचा विरुद्ध कलम ३५३ व ३३२ अंतर्गत गुन्हे दाखल केले असून जखमी धर्मेंद्रकुमार याला पांढरकवडा येथे उपचारा साठी पाठविण्यात आले. धर्मेंद्कुमार याची तपासणी केल्यानंतर दुखापत निघाल्यास आणखी कलमा वाढवणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मांगली रेल्वेगेटवरील फाटकाजवळ तसेच त्या परिसरात लाईटची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण ड्युटी कर्मचारी यांना होत आहे. तसेच जनतेला रेल्वेगेट दिसत नसल्याची ओरड करून उपस्थित कर्मचाऱ्यांसोबत लोक हुज्जतबाजी सुद्धा करतात. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान, संदीप कुमरे, प्रवीण तालकोकुलवार, संजय खांडेकर करीत आहे.
Comments
Post a Comment