प्रकल्प अधिकारी हटाव या मागणी साठी पांढरकवडा येथे सरपंच संघटना व आदिवासी समाज बांधवांनी काढला मोर्चा
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ)
पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन हटाव या प्रमुख मागणीला घेवुन २६ रोजी केळापुर व राळेगाव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच संघटना तथा आदिवासी समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी यांच्यावर विविध आरोप करीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये त्यांची येथुन हकालपट्टी करण्याची मागणी मोर्चेकरांनी
केली होती. सदर मोर्चा शहराच्या वाय पॉईंट येथुन काढण्यात आला होता. सदर मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत उपविभागीय अधिकारी केळापुर यांच्या कार्यालयावर पोहचला. येथे नायब तहसिलदार लहु चांदेकर यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. त्यानंतर मोर्चास विविध मान्यवरांनी बिरसा मुंडा चौकातील सभेत संबोधले. प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विचारण्यास गेलेल्या लाभार्थ्यांना तथा गाव पातळीवर काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यां ना सुध्दा योजनेची माहिती न देता, त्यांना पोलीस बळाचा वापर करुन कार्यालया बाहेर हाकलुन
लावतात. त्यांच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरीता असलेल्या योजनांची अंमलबजावणी त्या करीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदिवासी योजनांची वेळेत
अंमलबजावणी न करणे व अधिकाराचा दुरुपयोग करुन आदिवासी लाभार्थ्यांनाच धाकदपट करणाऱ्या येथील प्रकल्प अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी मोर्चे दरम्यान करण्यात आली. मोर्चास विनिश घोसले, भिमराव आत्राम, अरविंद वाढोणकर, बंडु सोयाम, अशोक गिरटकर, प्रशांत सोयाम आदि मान्यवरांनी संबोधीत केले.
Comments
Post a Comment