पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डी येथे विठुरायाच्या नामस्मरणात पालखी सोहळा संपन्न
पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज,आकुर्डी येथे विठुरायाच्या नामस्मरणात पालखी सोहळा संपन्न
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१६) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज,आकुर्डी या विद्यालयामध्ये 'आषाढी एकादशी' निमित्त, पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या संत परंपरेची महती जपणारा आषाढ महिना म्हणजे, संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय व संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा. हा सोहळा पीडीइएचे इंग्लिश मीडियम स्कूल येथेही प्रतिकात्मक रूपात उत्साहाने साजरा केला गेला. यामध्ये विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, वारकऱ्यांची तसेच संतांची वेशभूषा करत उत्साहाने सहभागी झाले. सर्व बालवारकरी हातामध्ये पताका, पालखी, डोईवर तुळशी वृंदावन, हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन टाळ- वीणेच्या गजरात विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होत,आकुर्डी येथील 'विठ्ठल-रुक्मिणी' मंदिरामध्ये पोहोचले. तेथे विद्यार्थ्यांनी विठुरायाचे दर्शन घेत पसायदान वदन केले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचे प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विविधांगी सांस्कृतिक सादरीकरणातून पांडुरंगाप्रती भक्ती व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग-ओवी गायन, नृत्याविष्कार, पालखी परंपरेची माहिती सादर केली. अशाप्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात चिमुकल्या वारकऱ्यांनी पालखीचा आनंद लुटला. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची महान संत परंपरा, पालखी सोहळ्याचा इतिहास व अध्यात्मिक शक्तीचे महत्व समजण्यास मदत होते, या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बोंद्रे व आभार प्रदर्शन रेखा रोकडे यांनी केले.
Comments
Post a Comment