पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१४ ) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज,आकुर्डीमध्ये गणेशोत्सव विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. विद्यालयामध्ये 'श्री गणेशाची' शाडूमातीपासून बनविलेली सुबक व रेखीव मूर्ती स्थापन करण्यात आली होती. मूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनीच स्वहस्ते बनवली होती. गणेशाची प्रतिष्ठापना ही पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत, ढोल-लेझीमच्या ठेक्यावरील नृत्यासह करण्यात आली.
बाप्पाची आरती प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात करण्यात येत होती. यावर्षीच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सामाजिक संदेश देणारा 'नारी सबलीकरणाचा' देखावा. हा विषय अतिशय कलात्मकतेने मांडण्यात आला होता.
यामध्ये नारीची विविध रूपे दाखवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन तसेच स्त्रीधन म्हणून सुवासिनींचे सर्व अलंकार व शृंगारिक साहित्य मांडण्यात आले होते. स्त्री शक्ती आणि स्त्रीमध्ये असणारे विविध गुण याचे यथोचित दर्शन दाखवणारी चित्रेही प्रदर्शित करण्यात आली होती. महिलांवर होणारे अत्याचार हा एक गहन प्रश्न आजही समाजापुढे तितक्याच तीव्रतेने उभा आहे आणि यावर उपाययोजना तसेच समाजप्रबोधन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने देखाव्यामध्ये अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी काय काय उपाययोजना करता येऊ शकतात याचेही मार्गदर्शन प्रतिकृती व चित्रांद्वारे करण्यात आले होते. विद्यालयांमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये मातीच्या छोट्या मूर्ती बनवणे, मेडिटेशन, योगा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त बुक मार्क बनविणे, कागदी गणपती बनवणे, पर्यावरणपूरक व्हिडिओ/ रिल्स बनविणे, अथर्वशीर्ष पठण, गणपतीच्या कथा सांगणे हेही उपक्रम राबविण्यात आले. वरील सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गणपती विसर्जन सहाव्या दिवशी पारंपारिक पद्धतीने शाळेच्या प्रांगणात एका छोट्याशा हौदात करण्यात आले व माती विरघळलेले पाणी झाडांना घालण्यात आले. येणाऱ्या नवीन पिढ्यांना सकारात्मक सामाजिक गोष्टी समजाव्यात व त्यांनी स्वतःच्या आयुष्यातही त्या आचरणात आणाव्यात, या उद्देशाने या सर्व उपक्रमांचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
Comments
Post a Comment