विद्यार्थ्यांमध्ये पालकांनी आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज – बाबुराव मैदर्गे
पुज्य नगरी ऑनलाईन न्यून
प्रतिनिधी नितीन बारकुल
"सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे." असे प्रतिपादन संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे डायरेक्टर बाबुराव मैदर्गे यांनी केले.
येरमाळा येथील विद्यानिकेतन शिक्षण संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रथम दिवशी केजी व प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, ज्येष्ठ शिक्षक हरी जाधव आणि सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी विद्यानिकेतन स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील आणि स्वाती पाटील होते. उद्घाटनप्रसंगी के. वाय. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, लावण्या, मराठमोळी गीते आणि हिंदी चित्रपट गीतांवरील नृत्याविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
[] दुसऱ्या दिवशीचा समारंभ
दुसऱ्या दिवशी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे डायरेक्टर बाबुराव मैदर्गे, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, माजी सभापती विकास बारकुल, दत्तात्रय बोधले, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबुराव मैदर्गे म्हणाले, "विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळवायच्या असतील, तर त्यांना इयत्ता सहावीपासूनच फाउंडेशन कोर्ससाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावर्षीपासून हा कोर्स सुरू होत असून, याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी पाहावी आणि त्या दिशेने कठोर मेहनत करावी."
विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल हे जिल्ह्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून नावारूपाला आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात या शाळेने लाखोंचे बक्षीस पटकावले आहे. तसेच जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन करून उत्कृष्ट नियोजनाने कार्यक्रम पार पडला आहे.
कार्यक्रमात सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रोहिणी शिंदे आणि भाग्यश्री पाळवदे यांनी केले, तर शेवटी आभार लोंढे यांनी मानले.
विद्यार्थ्यांचा कलाविष्कार आणि धमाल
विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे प्रभावी प्रदर्शन केले. संपूर्ण स्टेजच्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. नंदिनी प्रमोद पाटील, राजनंदिनी बांगर, सलोनी देशखैरे, मयुरी जोगी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यामध्ये देशभक्तीपर गीते, लोकगीते, लावण्या आणि हिंदी चित्रपट गीतांवरील नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. "जलवा जलवा" या देशभक्तीपर गीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले, तर मराठमोळी लावणी आणि पारंपरिक नृत्यांनी प्रेक्षकांना आनंदित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख उषा बारकुल, रेखा वाघमारे, वसतिगृह अधीक्षक बावकर, गायकवाड, तसेच इंटरनॅशनलच्या प्राचार्या प्रियांका काकडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षा पवार आणि संपूर्ण शिक्षकवृंदांनी विशेष मेहनत घेतली.
—
Comments
Post a Comment