संत सोपानकाका सुंदर माझी शाळा' अभियानामध्ये पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीच्या विद्यालयास तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर
'संत सोपानकाका सुंदर माझी शाळा' अभियानामध्ये पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आकुर्डीच्या विद्यालयास तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
पुणे, आकुर्डी (ता.१७) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी या विद्यालयाला 'संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान' या उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
ही स्पर्धा संत सोपानकाका सहकारी बँक लि. सासवड यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे संस्थापक माजी आमदार स्व.चंदूकाका जगताप यांच्या प्रेरणेतून संस्थेच्या मार्गदर्शिका आनंदीकाकी जगताप व बँकेच्या संचालिका राजवर्धिनी जगताप यांनी पुणे विभागातील शाळा स्वच्छ,आरोग्य संपन्न व गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा विभाग निहाय, तालुका निहाय तसेच जिल्हा निहाय भरवण्यात आली होती. त्यानुसार बक्षिसांचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी ठराविक निकष निश्चित करण्यात आले होते. जसे की शालेय इमारत व भौतिक सुविधा, विद्यार्थी पटसंख्या, पर्यावरण पूरक, स्वच्छता विषयक व आरोग्य विषयक शाळेत राबविण्यात आलेले विविध उपक्रम, स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता इ. निकषांच्या आधारे शाळेचे मूल्यांकन व गुणांकन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पुणे, सातारा, सोलापूर सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. यामधून पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज,आकुर्डी या विद्यालयाने पिंपरी चिंचवड विभागातून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम व प्रमाणपत्राच्या स्वरूपात बक्षीस मिळविले आहे. या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांनी सर्व शिक्षकांस व विद्यार्थ्यांस प्रेरणा तसेच मार्गदर्शन देऊन यश संपादन केले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, पालक यांच्याकडून मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment