रोहकल शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकांचा अनुभव
रोहकल शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकांचा अनुभव
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकल येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका प्रत्यक्ष अनुभवत अध्यापनाचा अनोखा अनुभव घेतला.
या दिवशी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांवर तासिकेनुसार अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वर्ग सांभाळत शिक्षकांची जबाबदारी पार पाडली. स्वयंशासन दिनी प्राथमिक शिक्षणाधिकारी शंभूराजे कोलते व मुख्याध्यापक समर्थ जाधव या पदांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी सांभाळली.
तसेच शिक्षकांच्या भूमिकेत कु. अक्षरा अंकुश, श्रुती जाधव, ज्ञानेश्वरी जाधव, स्नेहल माने, शिवानी सरवदे व स्वराजंली काळे यांनी अध्यापनाचे काम करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीमती दुर्गा खामकर व मुख्याध्यापक रवींद्र थोरात यांच्या सहकार्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
दररोज अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या जागी एक दिवस वर्ग सांभाळताना विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. “सर, तुम्ही हे सर्व रोज कसे सांभाळता?” अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांना भावना व्यक्त करताना अश्रूही अनावर झाले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेला थोर शास्त्रज्ञांच्या प्रतिमा भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक रवींद्र थोरात, सहशिक्षक दुर्गा खामकर, कल्याणी तांबे व सुदर्शन गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम सुरेखपणे पार पाडला.
Comments
Post a Comment